अकोला : लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध विकास कामांना आचारसंहितेचा फटका बसला. त्यामध्ये २५ टक्के कामे सुरूच होऊ शकली नाहीत. विकास कामे करणाऱ्या ८५ विभागाकडे असलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.निवडणुकीच्या आचारसंहितेत विकास कामे नव्याने सुरू करता येत नाहीत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कामे सुरू केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच कामांची सद्यस्थिती मागवली. त्यामध्ये ८५ विभागांनी त्यांच्या कामाची माहिती सादर केली. या विभागांकडे एकूण ३१५५ कामे सुरू असून, ७५८ कामे आचारसंहितेमुळे सुरूच झालेली नसल्याची माहिती देण्यात आली. रखडलेली सर्वाधिक कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आहेत. या विभागाची २६२ कामे सुरू असून, ८० कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली, तर महापालिकेच्या बांधकाम विभागाची १०० कामे सुरू असून, ७६ कामे अडकलेली आहेत.
- आचारसंहितेत अडकलेली कामेजलप्रदाय विभाग मनपा-६, विद्युत विभाग-२, अकोट नगर परिषद-२५, नगर परिषद बाळापूर-१४, लघुसिंचन जिल्हा परिषद-२४, गटविकास अधिकारी बार्शीटाकळी- ३३, तेल्हारा-२५, सार्वजनिक बांधकाम विभाग-४८, उपकार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प-२३, कृषी विद्यापीठ-१३, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी-३१३, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-२२ कामे आचारसंहितेत अडकली आहेत.