जलसंधारणाच्या कामांतून उपलब्ध होणार २७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:24 PM2018-06-18T15:24:34+5:302018-06-18T15:24:34+5:30
अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची ७१ कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या या कामांतून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची ७१ कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या या कामांतून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
शासनाच्या मृद व जलसंधारणाच्या विभागाच्या गत २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजकरिता जलसंधारण उपचाराच्या कामांची सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार नवीन शेततळे खोदणे, शेततळ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला, साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे करण्यासाठी खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, शेततळे, तलाव, नाला खोलीकरण व नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गत महिन्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्याद्वारे पावसाळ्यात २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या कामांची सांगड घालून, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक ७१ ठिकाणी जलसंधारणाच्या कामांची परवानगी देण्यात आली. त्यापैकी बहुतांश जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. जलसंधारणाच्या या कामांमधून २ हजार ७०० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी