अकोला : गेल्या तीन महिन्यात अनेकवेळा झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका महावितरणच्याअकोला परिमंडळाला बसला आहे. यामध्ये आतापर्यत परिमंडळातील १३७९ वीज खांब पडले. तर १९१ किमी लांबीच्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत. परिणामी परिमंडळातील ११२ गावांचा वीज पुरवठा बाधीत झाला होता. पण वेळोवेळी युध्दस्तरावरील प्रयत्नाने बाधीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.वादळ वाºयाने अनेकाचे संसार उध्वस्त केले आहे. महावितरणची यंत्रणा उघड्यावरच असल्याने या अस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही. गेल्या तीन महिन्यात परिमंडळात झालेल्या वादळ - वाºयाने परिमंडळातील अकोला जिल्हयात उच्चदाबाचे १८० आणि लघूदाबाचे ४६८ वीज खांब पडले होते. बुलढाणा जिल्हयात उच्चदाबाचे १८९ आणि लघूदाबाचे ३२४ तर वाशिम जिल्हयात ६८ उच्चदाबाचे आणि १५० लघूदाबाचे वीज खांब पडले होते.याशिवाय पडलेल्या वीज खांबासोबत अकोला जिल्हयात २९ किमी लांबिच्या उच्चदाब वाहिन्या व ५७ किमी लांबिच्या लघूदाब वाहिन्याही तुटल्या होत्या. तीन ठिकाणचे रोहीत्र कोसळले होते. २२ रोहित्रे ही फेल होऊन निकामी झाली होती. १३७ ठिकाणचे रोहित्र बॉक्स खराब झाले होते. बुलढाणा जिल्हयात ३२ किमी उच्चदाब व ६८.८ किमी लघूदाब वाहिनी तुटली होती,याशिवाय ९ ठिकाणचे रोहीत्र कोसळले. २८ रोहित्रे ही निकामी झाली होती. १७ ठिकाणचे रोहित्र बॉक्स खराब झाले होते. वाशिम जिल्हयाचा विचार केला तर फक्त ४.३ किमी लांबीची लघूदाब वाहिनीच तुटली होती.वादळामुळे उध्वस्त झालेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे. अकोला - १.७४ कोटी, बुलढाणा-१.५५कोटी आणि वाशिम - ११ लाख असे एकून ३ कोटी ४१ लाखाचा मोठा आर्थिक फटकाही महावितरणला बसला आहे. वेळोवेळी प्रसंगानुरूप महावितरणच्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने बाधीत झालेल्या ११२ गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.पावसाळ्याला सुरूवात होणार आहे,त्यामुळे महावितरण संपूर्ण परिमंडळ स्तरावर देखभाल दुरूस्तीचे कामांना गती देण्यात आली आहे. देखभाल दुरूस्तीचे काम वीज पुरवठा खंडित केल्याशिवाय करता येत नाही,त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे करावे असे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतिने करण्यात येत आहे.
वादळ-वाऱ्यामुळे अकोला परिमंडळाला ३ कोटी ४१ लाखाचा फटका
By atul.jaiswal | Published: June 09, 2020 3:46 PM