बियाण्यांचे ३00 संशयीत नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2016 12:41 AM2016-08-05T00:41:15+5:302016-08-05T00:41:15+5:30
बुलडाणा जिल्ह्याभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.
गणेश मापारी
खामगाव (जि. बुलडाणा), दि. ४- बुलडाणा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करुन संशयीत असलेल्या २७९ बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने संकलीत केले आहेत. नागपूर येथील शासकीय बिज परीक्षण प्रयोग शाळेत सदर नमूने जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर बियाणे विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
गत तीन-चार वर्षांमध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरणार्या शेतकर्यांपेक्षा नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरणार्या शेतकर्यांचा आकडा मोठा आहे.
त्यामुळे शेतकर्यांची पसंती असलेल्या सोयाबीन बियाण्यांची बनावट पाकिटे तयार करुन विक्री केल्या जातात. कपाशी, तूर, मूग, उडिद या पिकांच्या बाबतीतही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांकडून कोणत्याही परिस्थितीत बनावट बियाणे विकल्या जावू नये यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकाच्या माध्यमातून दरवर्षी कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे मुदतबाह्य बियाणे विक्री, बियाणे खरेदी व विक्रीमधील तफावत यासह इतर मुद्यांवर संशय असल्यास कृषी विभागाकडून संबंधित बियाण्यांचे नमूने प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी घेण्यात येतात. भरारी पथकाने यावर्षी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून २७९ संशयीत बियाण्यांचे नमूने तपासणीसाठी घेतले आहेत.
ही सर्व संशयीत नमूने नागपूर येथील शासकीय बीजपरीक्षण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी असलेल्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे.
किटकनाशकांची तपासणी गरजेची
संग्रामपूर तालुक्यात नुकतेच एका कृषी सेवा केंद्रातून मुदतबाह्य किटकनाशकाची विक्री केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पेरणी झाल्यानंतर फवारणीसाठी किटकनाशक औषधांची मोठय़ा प्रमाणात विक्री केल्या जाते. याचाच फायदा घेवून विक्रेते मुदतबाह्य औषधांची विक्री करतात. त्यामुळे कृषी विभागाने किंवा भरारी पथकाने संशयित बियाण्यांच्या तपासणीप्रमाणेच किटकनाशके तसेच खतांचे नमूने देखील तपासणीसाठी घेण्याची गरज आहे.
कृषी सेवा केंद्रांकडून बोगस बियाण्यांची विक्री होवू नये त्यासोबतच कोणत्याही बियाण्यांची विक्री नियमानुसारच व्हावी यासाठी कृषी विभागाकडून तपासणी केल्या जाते. जिल्ह्याभरातून संशयीत बियाण्यांचे नमूने घेण्यात आले असून सदर बियाणे तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
- ए.ओ. चोपडे, मोहिम अधिकारी
कृषी विभाग जि.प.बुलडाणा