शहर विकासासाठी ३८ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 02:04 AM2016-07-19T02:04:47+5:302016-07-19T02:04:47+5:30
अकोला मनपाच्या प्रशासकीय इमारतीचा समावेश; गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांचा पाठपुरावा.
अकोला: शहराच्या सर्वांगीण विकास कामांसाठी राज्य शासनाने ३८ कोटींच्या निधीला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मंजुरी दिली. आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी मंजूर केला. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रासह राज्यात व महापालिकेतदेखील सत्तापरिवर्तन झाल्यापासून अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्तीसाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे २0 कोटींचा पाठपुरावा केला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठवलेल्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देत अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच २0 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहेत. यादरम्यान, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रशस्त रस्त्यांची गरज लक्षात घेता आ. शर्मा यांनी दहा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याच धर्तीवर अकोला पूर्व मतदारसंघातील विकास कामांसाठी आ. रणधीर सावरकर यांनीदेखील दहा कोटींचा प्रस्ताव सादर केला.
तसेच महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी दहा कोटींची मागणी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही लोकप्रतिनिधींच्या मागणीवर शिक्कामोर्तब करीत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ३0 कोटींच्या निधीला मंजुरी दिली.