अकोला: पंधरा वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त एकाच ठिकाणी ठाण मांडणार्या शिक्षकांची उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. अशा ४२ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने तयार केली असून त्यांची लवकरच इतर शाळांवर बदली केली जाणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार सर्वश्रुत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यास सक्षम नसणार्या या विभागातील काही खादाड अधिकार्यांनी कधीही शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला नाही. काहीही ठोस कारण नसताना वर्षभरातून एकदा बोटावर मोजता येणार्या शिक्षकांच्या बदल्या करायच्या आणि आर्थिक सोपस्कार पार पडताच अवघ्या महिनाभरात बदली प्रक्रिया रद्द करण्याचे धोरण शिक्षण विभागाने अवलंबिले होते. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कवडीचाही वचक नसल्याने सर्वत्र अनागोंदी माजल्याचे चित्र होते. शिक्षक संघटनादेखील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून बालवाडी, नर्सरी व सेमी इंग्लिश लागू करण्यापेक्षा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती, सहावा वेतन आयोग लागू करून विविध भत्ते पदरात पाडून घेण्यासाठी कायम आग्रही राहिले. त्याचे परिणाम समोर येत आहेत. काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांची मनमानी सुरू असल्यामुळे एकाच शाळेत चक्क २0-२0 वर्षांपासून शिक्षक ठाण मांडून बसल्याची परिस्थिती आहे. याचा परिणाम पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर होत असून पर्यायाने विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे. ही बाब महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. ज्या शिक्षकांना एकाच शाळेवर १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल त्यांची इतर शाळेवर बदली करण्याचा निर्णय घेतला. अशा ४२ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने तयार केली असून आयुक्तांकडे सोपवली आहे.
महापालिकेच्या ४२ शिक्षकांच्या बदल्या होणार!
By admin | Published: July 20, 2016 1:28 AM