अकोला: पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायींतीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून ह्या थकबाकीचा भरणा करण्याच्या सुचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फ़े राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ९९० जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४५ कोटी ६९ लाख ०९ हजाराची थकबाकी आहे
ग्रामविकास विभागातर्फ़े दि. २८ फ़ेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अति-तात्काळ असा शेरा असलेले पत्र देण्यात आले असून या पत्रात सदर सुचना करण्यात आली आहे. संपुर्ण राज्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करु शकते, अशी शक्यता वर्तवित असल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून ह्या थकबाकीचा भरणा करण्याच्या सुचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.
अकोला मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ९९० जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४५ कोटी ६९ लाख ०९ हजाराची थकबाकी आहे यामध्ये अकोला ग्रामीण विभागामध्ये ६७१ जोडण्या असून त्यांचेकडे ३८कोटी ३७ लाख ९० हजार तर अकोट विभागामध्ये २९१पथदिव्यांच्या जोडण्या असून त्यांचेकडे ७ कोटी ३० लाख ३८ हजार इतकी थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदार स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणने ‘थकबाकी भरा अन्यथा नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित करु’ अशा आशयाची नोटीसही बजावली असून, अनेक नोटीसेसची विहीत मुदतही संपली असल्याने त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाण्याचा इशारा महावितरणतर्फ़े देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांकडे वीजबिलापोटी असलेली थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी महावितरण ‘शुन्य थकबाकी’ मोहीम राबवित आहे घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपुर्ण थकबाकीसोबतच मागिल आर्थिक वर्षातील थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीदार ग्राहकांनी त्यांचेकडील चालू वीजबिल आणि थकबाकीचा त्वरीत भरणा करून वीजपुरवठा खंडित केल्याने होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.