अकोला जिल्हा कारागृहातील ४५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 10:54 AM2021-02-10T10:54:00+5:302021-02-10T10:54:20+5:30
Akola District Jail बंदिस्त असलेले ४५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांची भेट नाकारण्यात आलेली आहे. दरम्यान, अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेले ४५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. कारागृह प्रशासनाने त्यांना मोबाईल व व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने विविध घटकांवर परिणाम केला आहे. मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढायला लागला. यावेळी खबरदारी म्हणून शासनाने सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यासोबतच जिल्हा कारागृहातील कैद्यांना संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध आणले.
कधी मोबाईल फोन; तर कधी व्हिडिओ कॉल
जिल्हा कारागृह प्रशासनाने नातेवाईकांसोबत बोलण्याकरिता कैद्यांना मोबाईल फोन किंवा व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी दिलेली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही, अशी स्थिती आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून शासनाने जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध घातले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही. मात्र, त्यांना मोबाईल फोन व व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- सोरते, जिल्हा कारागृह अधीक्षक,