लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पातूर तालुक्यातील उमरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सात निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद आरोग्य विभागाने केली. त्यातून नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते, असा ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्याचाही आक्षेप असल्याचे बांधकाम समितीच्या सभेत मंगळवारी सांगण्यात आले. त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोपही सदस्य द्रौपदाबाई वाहोकार यांनी सभेत केला. बांधकाम समितीची सभा उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्या प्रतिभा अवचार, द्रौपदा अवचार, मंदा डाबेराव, संतोष वाकोडे उपस्थित होते. मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. सोबतच आधी मंजूर काही कामांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सभेत पातूर तालुक्यातील उमरा येथे सात निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाने तब्बल ५० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. त्यातून दुरुस्तीवर आतापर्यंत २३ लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. पातूरचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड यांना दुरुस्तीचे अंदाजपत्रक बदलून नवीन इमारतीचे करण्यासाठी आधीच या गटाच्या सदस्य म्हणून वाहोकार यांनी पत्र दिले; मात्र त्याची दखल न घेताच केवळ दुरुस्तीसाठी ५० लाखांचा खर्च सुरू करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एवढ्या निधीत नवीन इमारतीचे बांधकाम होऊ शकते, दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्याचा अट्टहास राठोड का करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर याप्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गावंडे यांनी सभेत सांगितले.
निवासस्थाने दुरुस्तीसाठी ५० लाखांचा खर्च
By admin | Published: May 17, 2017 2:13 AM