अकोला: जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी पिकांसह भाजीपालावर्गीय व संत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील ५० गावांना फटका बसला असून, ३ हजार ४७६ हेक्टरवरील पिके बाधित झाले आहे.
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, रब्बी पिकांना फटका बसला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.
त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात ३ हजार ७२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, १ हजार २३७ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना नोंदवा
पीक विमा योजनेत सहभागी बाधित शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कंपनीद्वारा वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी पीक विमा योजना आहे. या योजनेत रब्बी पिकांसाठी जिल्ह्यातील १२ हजार ३७१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याद्वारे १५ हजार १२४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. त्यामुळे मुदतीत कंपनीकडे माहिती देणे, रब्बीची ई पीक पाहणी करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
अवकाळीमुळे असे झाले नुकसान
तालुका नुकसानग्रस्त गावांची संख्या नुकसानग्रस्त शेतकरी क्षेत्र
बार्शीटाकळी १० २१७ १५५
पातूर २३ २३९३ २०९३तेल्हारा १७ ११११ १२२८एकूण ५० ३७२१ ३४७६