अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत यावर्षी ९० टक्क्यांवर पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकरी आनंदित आहेत; परंतु पावसाचे तीन महिने संपूनही धरणांच्या जल पातळीत पूरक वाढ झाली नाही. गत तीन ते चार वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणाºया या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.जुलै-आॅगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ ८.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा मोठ्या धरणात २३.३७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पेनटाकळीमध्ये यावर्षी बºयापैकी ७८.४२ टक्के साठा असला तरी खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८२.८५ टक्के जलसाठा संचयित झाला असून, मोर्णा मध्यम प्रकल्पात २३.८५ टक्के जलसाठा आहे. निर्गुणा प्रकल्पात १७.३०, टक्के उमा प्रकल्पात ११.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात ६८.७६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी पूसमध्ये केवळ ४०.०७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १२.१६ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात मात्र ८१.७९ टक्के पाणी आले आहे.
मोठ्या नऊ प्रकल्पांत ५२.४७ टक्के साठाअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पात आजमितीस ५२.४७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५८.४२ तर ४६९ लघू प्रकल्पांत ४१.९८ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पावसाळ्याचे आता तीन महिने संपले असून, आता येणारा पाऊस बिनभरवशाचा असतो. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.