- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया १२ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. गत आठ दिवसांमध्ये शहरातील ९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार ९५५ जागा आहे. यंदा कोरोनाचा फटका प्रवेश प्रक्रियेलासुद्धा बसणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. प्रवेश अर्ज कमी आल्यामुळे यंदा ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी इ. दहावीचा निकाल ९५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ८ हजार ९३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर प्रथम श्रेणीत ९ हजार ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा विज्ञान शाखेच्या जागा कमी पडतील, असे वाटत होते; परंतु कोरोनामुळे तालुका ठिकाणांवरील विद्यार्थ्यांनी यंदा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधील विद्यार्थीसुद्धा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासोबतच खासगी शिकवणी वर्गांसाठी अकोला शहराकडे धाव घेत होते; मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे पालक आता विद्यार्थ्यांना बाहेरगावी पाठवायला तयार दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर झालेला दिसून येत आहेत. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची २0 आॅगस्ट अखेरची मुदत होती. २५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आरक्षणनिहाय यादी प्रकाशित होणार आहे. उशिरा सायंकाळपर्यंत आणखी ५00 ते ६00 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज येणार आहे. साडेचार हजारापर्यंत विद्यार्थ्यांचे आले तरी उर्वरित ४ हजार ४५५ जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास, त्यांनी प्रवेश प्रक्रिया समिती, भारत स्काउट गाइड कार्यालयात संपर्क साधावा, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव प्राचार्य गजानन चौधरी यांनी दिली.
तालुक्यातील महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कलकोरोनाच्या पृष्ठभूमीवर पालक सतर्क झाले आहेत. आॅनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढल्यामुळे आता पालक, विद्यार्थ्यांचा शहरात येण्याचा कल कमी दिसत आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.
१ सप्टेंबरपासून प्रवेशाची दुसरी फेरीशिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्या महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागा भरल्या गेल्या, ती महाविद्यालये वगळून इतर महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागांवर आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.