विभागासाठी कोव्हॅक्सिनचे ५६ हजार, तर कोविशिल्डचे ७१ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:39 AM2021-05-06T10:39:21+5:302021-05-06T10:41:16+5:30
Corona Vaccination : अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होईल.
अकाेला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी बुधवारी कोव्हॅक्सिनचे ५६ हजार, तर कोविशिल्डचे ७१ हजार ७००, असे एकूण १ लाख २७ हजार ७०० डोस प्राप्त झाले आहेत. कोव्हॅक्सिनचे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये अकोल्यासाठी कोव्हॅक्सिनचे १२ हजार, तर कोविशिल्डचे ८ हजार डोस आहेत. लस प्राप्त झाल्याने गुरुवारपासून अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होईल. राज्यभरात कोविड लसीकरण मोहिमेला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र गरजेनुसार लसीचा साठा शिल्लक नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. गत आठवडाभरापासून ४५ वर्षावरील लाभार्थ्यांची कोविड लसीकरण मोहीम अकोला मनपा क्षेत्रात प्रभावित झाली होती. लसीअभावी अनेक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावरून परतावे लागले होते. दरम्यान, राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लस उपलब्ध झाली. त्यामुळे ४५ वर्षावरील लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याने अनेक केंद्रांवर वाद झाल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी सकाळी आरोग्य विभागाच्या अकोला मंडळाला कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा मोठा साठा प्राप्त झाला. प्राप्त लसीच्या साठ्यामध्ये अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्ह्यांचा समावेश असून, आरोग्य विभागातर्फे लसीचे डोस पाचही जिल्ह्यांना पुरविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यात लसीकरणाला पुन्हा सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला.
जिल्हानिहाय लसीचा पुरवठा
जिल्हा - कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड
अकोला - १२,००० - ८,०००
बुलडाणा - १२,००० - १२,१००
वाशिम - ८,००० - ४,१००
यवतमाळ - १२,००० - ३१,६००
अमरावती - १२,००० - १५,९००
---------------------------
एकूण - ५६,००० - ७१,७००
विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी कोविशिल्डचे ७१,७००, तर कोव्हॅक्सिनचे ५६ हजार डोस प्राप्त झाले आहेत. बुधवारी पहाटे लसीचा साठा अकोल्यात आला असून जिल्हानिहाय वितरण करण्यात येत आहे.
- राजेंद्र इंगळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, विभागीय लस भंडार, अकोला