अकोला : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले असून, प्रजासत्ताक दिनापासून मोफत गणवेश वाटप सुरू करण्यात येणार आहे.
मोफत गणवेश वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थिनी (मुली) तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी (मुले) तसेच दारिद्र्यरेषेखालील पाल्यांची मुले अशा एकूण जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येक एक या प्रमाणे मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. मोफत गणवेश योजनेंतर्गत दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वाटप करण्यात येते. त्यासाठी प्रती गणवेश ३०० रुपये प्रमाणे दोन गणवेश संचाकरिता प्रती विद्यार्थी ६०० रुपयांची तरतूद मंजूर आहे. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वितरीत करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले असून, गणवेश खरेदीसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने शाळा सुरु होण्यापूर्वी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शाळांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) मोफत गणवेशाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.
मोफत गणवेश वाटपासाठी असे आहेत पात्र विद्यार्थी!
तालुका विद्यार्थी
अकोला १२५०१
अकोट ११११४
बाळापूर १०३०६
बार्शिटाकळी ७७७७
मूर्तिजापूर ७३९७
पातूर ६५२३
तेल्हारा ८८९५
...........................................................
एकूण ६४५१३
प्रवर्गनिहाय पात्र विद्यार्थ्यांची अशी आहे संख्या!
मोफत गणवेश वाटप योजनेत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीमधील सर्व ३७ हजार ६१० मुली, अनुसूचित जाती प्रवर्गातील १० हजार २०२ मुले, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ३ हजार ८१६ मुले व दारिद्र्यरेषेखालील पाल्यांची १२ हजार ८८५ मुले इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजनेत जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास एक गणवेश वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना निधी वितरीत करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- वैशाली ठग
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद