एचआयव्ही पॉझिटिव्ह ७ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:04 AM2021-01-13T11:04:03+5:302021-01-13T11:04:12+5:30
Akola News समाधानाची बाब म्हणजे एचआयव्हीग्रस्त मातांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला.
अकाेला : जिल्ह्यातील वयोवृद्धांसह गर्भवतींनाही कोविडचा धोका असून, गत दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. मात्र समाधानाची बाब म्हणजे एचआयव्हीग्रस्त मातांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. काेराेनाचा उद्रेक झालेल्या २०२० या संपूर्ण वर्षात ७ एचआयव्हीबाधित महिलांचा समावेश असून सन २०१९ मध्ये ९ महिलांचा समावेश हाेता. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने गर्भवतींसाठी घातक ठरले. नोव्हेंबरपासून मात्र गर्भवतींमध्ये कोविडचे प्रमाण घटल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गर्भवतींमध्येही कोविडचे रुग्ण आढळून येऊ लागले. त्या अनुषंगाने जिल्हा स्री रुग्णालयाने विशेष खबरदारी घेत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली. अशा गर्भवतींसाठी सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती कक्ष राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांनाही काेराेनापासून संरक्षण मिळाले व या मातांनी काेराेनासाेबतच एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांनाही लाभ झाला.
एचआयव्ही तसेच काेविडबाधित गर्भवतींच्या प्रसूतीमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच नवजात शिशूंनाही संसर्ग होण्याची भीती होती. परंतु, आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीमुळे हे आव्हान यशस्वी पेलले गेले. एचआयव्हीग्रस्त मातांची विशेष काळजी घेतल्या गेली.
- दर्शन जनईकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण