-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील फणी गावात एकटीच म्हातारी राहत असून 'फणी गावावर ७० वर्षांच्या म्हातारीचे अधिराज्य' या शिरषकाखाली बुधवारी 'लोकमत'ने बातमी प्रकाशीत करताच बातमीची दखल घेऊन प्रशासन तातडीने फणी गावात दाखल झाले. म्हातारीला भेटून तहसीलदारांनी तात्पुरती मदत केली तेव्हा ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाईंनी गहिवरून आपली कहाणी सांगितली. काही वर्षांपूर्वी फणी गावाची दोनशेच्यावर लोकवस्ती होती, कालांतराने हळूहळू लोकांनी आपले गाव सोडले. २०११ च्या जनगणनेनुसार त्या गावात ३५ लोक राहत असल्याची नोंद आहे. परंतू प्रत्यक्षात फणी गावात एकटीच म्हातारी राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे घर पावसाने क्षतिग्रस्त झाले असून बाजुच्या किणी गावात गुरांच्या गोठ्यात तिने आश्रय घेतला आहे. धानोरा वैद्य, किणी, फणी या तीन गावांमिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे सरपंच फणी या गावच्या असून त्याही मूर्तिजापूर येथे राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परंतू या गावात मोजके घरे उभे असले तरी ती घरे अडगळीत पडलेली आहेत, दरम्यान तहसीलदार प्रदीप पवार यांनी या गावात भेट दिली असता घराच्या आजूबाजूला असलेले गवत काढून आम्ही इथेच राहत असल्या आव संरपंचानी आणला. तहसीलदार प्रदीप यांनी सहानुभूतीपूर्वक आस्थेने आजीबाईची विचारपूस करुन तिला तिला धिर देत, दोन - तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्य व इतर साहित्य देवून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदतही केली.
लोकमतने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे हा प्रकार उघडकीस आला. बातमी वाचून आम्ही त्या गावात पोहोचलो, तेव्हा त्या गावात सध्या कोणीच राहत नाही, म्हातारीसाठी श्रावणबाळ योजनेत तरतूद, अन्नपुरवठा योजने अंतर्गत धान्य व घरकुलासाठी प्रयत्न करुन तिची आर्थिक व राहण्याची समस्या लवकरच पूर्ण करणार आहे.-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर