अकोला मंडळासाठी लसीचे ७० हजार डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:40+5:302021-01-14T04:15:40+5:30
कोरोनाचे थैमान सुरू असतानाच कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. गत आठवड्यात जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम झाल्याने, ...
कोरोनाचे थैमान सुरू असतानाच कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. गत आठवड्यात जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम झाल्याने, अनेकांचे लक्ष कोविड लसीकरणाकडे लागून आहे. दरम्यान, १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील लसीकरण होणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन लसीकरणाच्या तयारीला लागले आहे. याच दरम्यान बुधवारी सकाळी पुण्याहून जवळपास ७० हजार कोविड लसीचे डोस अकोल्यासाठी रवाना झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या लसी ठेवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक डोस हे बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांना मिळणार असल्याची माहिती आहे.
महिनाभरानंतर दुसरा डोस
कोविडची लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून लसीचा पहिला डोस १६ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यासाठी बुधवारी नऊ हजार डोस प्राप्त झाले आहेत. लसीचा दुसरा डोस महिनाभरानंतर प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत मिळाली आहे.
अकोल्यात ७,७८३ लाभार्थ्यांची नोंद
पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने लसीकरणासाठी महिनाभरापासून लाभार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. यामध्ये आतापर्यंत ७,७८३ पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
जिल्हानिहाय उपलब्ध लस
जिल्हा - लसीचा साठा
अकोला - ९०००
अमरावती - १७०००
बुलडाणा - १९०००
वाशिम - ६५००
यवतमाळ - १८५००
------------------------
एकूण - ७०, ०००