- संतोष येलकर,अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये शेततळे, तलाव, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.शासनाच्या मृद व जलसंधारणाच्या विभागाच्या गत २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजकरिता जलसंधारण उपचाराच्या कामांची सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार नवीन शेततळे खोदणे, शेततळ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला, साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे करण्यासाठी खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे. जलसंधारणाच्या कामातून उपलब्ध होणारे गौण खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी विनामूल्य देण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, शेततळे, तलाव, नाला खोलीकरण व नाला रुंदीकरण इत्यादी जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गानजीक ही जलसंधारणाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.कामांची परवानगी दिलेली अशी आहेत ठिकाणे!जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना परवानगी देण्यात आली. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्वी, वणी रंभापूर व पैलपाडा विभाग, बोरगाव मंजू, वडगाव, दाळंबी, भोड, माझोड, बाभूळगाव शिवार, शिवणी शिवार, अन्वी मिर्झापूर, बोरगाव भाग-४, खिरपुरी खुर्द, खेकडी, कवठा बॅरेज, मनब्दा, मांडोली, गुडधी, शिवणी, शिवर, बाभूळगाव शिवार, मनब्दा ते अटकळी व पंचगव्हाण, कमळगंगा हेंडज, पळसोडा, हातगाव, सोनोरी, जामठी बु., पारस, शेळद, रिधोरा, गोरव्हा, कान्हेरी, कुरुम, नागोली, शेलू वेताळ, अनभोरा, नवसाळ, ढगा, वाशिंबा, शहापूर रूपागड, मलकापूर, उमरी व कुंभारी इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये महामार्गानजीक जलसंधारण उपचाराच्या ७१ कामांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देण्यात आलेल्या कामांपैकी बहुतांश कामे सुरू करण्यात आली आहेत.-डॉ.अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी.