जिल्हयात ७२२१ ‘ओबीसी’ कुटुंबांना घरकुल मंजूर! ‘मोदी आवास’ योजना
By संतोष येलकर | Published: February 10, 2024 09:38 PM2024-02-10T21:38:16+5:302024-02-10T21:38:26+5:30
जिल्हास्तरीय समितीने दिली मान्यता
अकोला: ‘मोदी आवास घरकुल ’ योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हयातील इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी ) आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील ७ हजार २२१ लाभार्थी कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आले.
राज्यातील ग्रामीण भागातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासोबतच विशेष मागासवर्ग प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील पात्र कुटुंबांचा ‘मोदी आवास घरकुल’ योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय गेल्या २७ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निर्गमीत करण्यात आला. त्यानुसार २०२३...२४ या वर्षासाठी जिल्हयात ७ हजार ३५३ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यापैकी ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार जिल्हयात ‘ओबीसी’ आणि ‘एसबीसी’ कुटुंबातील लाभार्थ्यांना ७ हजार २२१ घरकुल मंजूर करण्यात आले.
तालुकानिहाय मंजूर
घरकुलांची अशी आहे संख्या !
तालुका घरकुल
अकोला १३७४
अकोट ८७८
बाळापूर १०९३
बार्शिटाकळी ९६१
मूर्तिजापूर १०८२
पातूर १२०८
तेल्हारा ६२५
पाच हजार लाभार्थ्यांच्या खात्यात
पहिल्या हप्त्याची रक्कम जमा !
‘मोदी आवास घरकुल’ योजनेत घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान घरकुलाच्या बांधकामानुसार चार टप्प्यात दिले जाते. त्यानुसार जिल्हयात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ९ फेब्रुवारीपर्यंत ५ हजार ८ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची १५ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांकडून घरकुलांची बांधकामे सुरु करण्यात आली आहेत.
‘मोदी आवास घरकुल ’ योजनेत जिल्हयात आतापर्यंत ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना ७ हजार २२१ घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी घरकुलांची बांधकामे तातडीने सुरु करुन पूर्ण करणे गरजेचे आहे.
बी.वैष्णवी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद