अकोला : ‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेऊन नियोजन केले आहे. या हंगामासाठी जिल्ह्याला ७७,९९० मेट्रिक टन खत साठा मंजूर झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक खत साठा उपलब्ध होणार आहे.
गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे ९५ हजार ७०० मेट्रिक टन खताची मागणी केली होती. तर ७७ हजार ९९० मेट्रिक टन साठा मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
शिवाय खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके सुद्धा नेमण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामासाठी सदर खतांचा साठा उपलब्ध होणार आहे. मंजूर खतांमध्ये युरिया २३ हजार १७० टन, डीएपी १६ हजार १२०, एमओपी ४ हजार ३५०, एनपीके २२ हजार ९८०, एसएसपी ११३७० असे एकूण ७७ हजार ९९० टन मंजूर झाले आहे.
२३,१०३ मे.टन साठा उपलब्ध
यावर्षी कृषी विभागाकडून ९५ हजार ७०० मे. टन खत साठा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मागील हंगामातील २३ हजार १०३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. ७ एप्रिल अखेर १२२ मे. टन साठा उपलब्ध झाला होता.