अतिवृष्टीच्या तडाख्यात ग्रामीण भागात ७९ रस्त्यांचे नुकसान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:53 AM2021-07-28T10:53:24+5:302021-07-28T10:53:31+5:30
79 roads damaged in rural areas due to heavy rains : ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंगळवारी शासनाकडे पाठविला.
- संतोष येलकर
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात २४५ किलोमीटर लांबीच्या ७९ रस्त्यांचे नुकसान झाले असून, ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंगळवारी शासनाकडे पाठविला.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात रस्ते वाहून गेले. तसेच रस्त्यांवरील लहान पूल, मोऱ्या व रपट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणावर परिणाम झाला. त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७९ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये या रस्त्यांवरील ३७ लहान पूल, मोऱ्या व रपट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत २७ जुलै रोजी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.
सहा प्रमुख जिल्हा मार्गांचे नुकसान!
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील सहा प्रमुख जिल्हा मार्गांचे आठ ते दहा किलोमीटर लांबीचे नुकसान झाले आहे. या मार्गाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
संपर्क तुटलेल्या गावांत तातडीच्या
कामांसाठी अंदाजपत्रक सादर !
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपर्क तुटलेल्या गावांत तातडीने करावयाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ४३ लाख रुपयांचे कामांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये तातडीने करावयाची दुरुस्तीची कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणार आहेत.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकसान झालेल्या ७९ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या दुरुस्ती कामांसाठी ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रस्ते दुरुस्ती कामांच्या या प्रस्तावात संबंधित रस्त्यांवरील लहान पूल, मोऱ्या व रपटे दुरुस्ती कामांचाही समावेश आहे. तसेच संपर्क तुटलेल्या गावांत तातडीने करावयाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ४३ लाख रुपयांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
नरेश अघम
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग.