अकोला : महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या परवानगीअभावी तब्बल ९० दिवस उशिराने अकोल्यातील महत्त्वाकांक्षी ‘फ्लायओव्हर’चे बांधकाम सुरू झाले आहे. कालावधी हातातून निघून जात असल्याने आता बांधकाम करणाऱ्या कंपनीने आता जागा मिळेल तेथे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोला शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘फ्लायओव्हर’ आणि भुयारी मार्गाची निर्मिती होत आहे. त्यासाठी जेल चौक ते अग्रसेन चौकापर्यंत ‘सॉइल टेस्टिंग’ करण्यात आले. ‘सॉइल टेस्टिंग’चे नमुने आले असले तरी अद्याप अकोला महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने अनेक परवानगी दिलेल्या नाहीत. यामध्ये बांधकाम कंपनीचे ९० दिवस वाया गेले आहेत. दोन वर्षांच्या आत अंकित बॅग हाऊस ते जनता बाजारपर्यंतचा भुयारी मार्ग आणि जेल चौक ते अग्रसेन चौकापर्यंत ‘फ्लायओव्हर’ बांधण्याचा करार झालेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागासोबत झालेल्या करारातील ९० दिवस निघून गेल्याने आता कंपनीने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. मध्यवर्ती कारागृहासमोर फ्लायओव्हरचे पिल्लर उभारले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा करण्यात आला आहे.वास्तविक पाहता, अकोला महापालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने जेल चौक ते अग्रसेन चौकापर्यंतची जागा या कंपनीला तातडीने मोकळी करून द्यायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. या मार्गावरील स्ट्रीट लाइट आणि दुतर्फा असलेले वृक्ष आणि इतर अतिक्रमण तातडीने काढणे गरजेचे आहे. यासंदर्भात परवानगी मिळावी म्हणून कंपनीने दीड महिन्याआधी अर्ज केला; मात्र अजूनही परवानगी देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रस्तावित उड्डाणपूल मार्गावरील विद्युत खांब हटविणे, वृक्षतोड करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सुरू केली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या परवानगीअभावी ‘फ्लायओव्हर’चे बांधकाम रेंगाळत आहे.माधव नगराजवळ उभारला प्लांटगोरक्षण मार्गावरील माधव नगराजवळच्या एकवीरा देवी मैदानात कंपनीने आपला प्लांट उभारला आहे. या प्लांटमुळे परिसरात प्रदूषण होईल, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे; मात्र कंपनीने हा आरोप खोडून काढीत येथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याचे सांगितले. मध्यवर्ती शहरात होत असलेल्या या प्लांटचा त्रास होऊ नये, याची खबरदारी लोकप्रतिनिधी आणि कंपनीने घ्यावी, असा सूर परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे.