६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, विशेष पथकाची कारवाई
By नितिन गव्हाळे | Published: October 18, 2022 06:15 PM2022-10-18T18:15:28+5:302022-10-18T18:15:48+5:30
अकोला येथे ६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अकोला : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने मंगळवारी दुपारी जुने शहरातील शाहबाबू हायस्कूलजवळ छापा मारून एका चारचाकी वाहनातून ६ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे कांदा विक्रीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी ३५ कट्टे कांदाही जप्त केला.
विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना जुने शहरात चारचाकी वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखू येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने या ठिकाणी छापा मारून वाहनातील ६ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. सोबतच पोलिसांनी एमएच ३० - बीडी ४३१२ क्रमांकाचे चारचाकी वाहनही जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शेख महेबूब शेख अब्दुल (३४, रा. नरसिंग वाडी, अकोला) आणि महेबूबशहा सत्तारशाह (२७, रा. गोडबोले प्लॉट, अकोला) यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.