राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:25+5:302021-06-25T04:15:25+5:30
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या ...
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत २२ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी प्रमुख राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या असून, जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणनिहाय संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
काँग्रेसची बैठक; तालुकास्तरावर
स्वीकारणार इच्छुकांचे अर्ज!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची काँग्रेसकडून तयारी सुरू करण्यात आली असून, बुधवारी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक स्वराज्य भवनात घेण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी सर्कलनिहाय इच्छुक उमेदवारांचे अर्ज २७ जूनपर्यंत तालुकास्तरावर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांकडे स्वीकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, बाबाराव विखे पाटील, डाॅ. सुभाषचंद्र कोरपे, बबनराव डाबेराव, हेमंत देशमुख, संजय बोडखे, डाॅ. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची
बैठक; सर्कलनिहाय आढावा!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी घेण्यात आली. त्यामध्ये पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कलनिहाय पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांकडून २८ जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे या वेळी ठरविण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, दिलीप बोचे, रवींद्र पोहरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख उपस्थित होते.
भाजपची तयारी सुरू;
उमेदवारांच्या घेणार मुलाखती!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची भाजपच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे आणि उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया दोन दिवसांनंतर सुरू करण्यात येणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची
रविवारी बैठक !
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार, २७ जून रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीत पोटनिवडणुकांची तयारी आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कलनिहाय संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.