मूर्तिजापूर तालुक्यात अपघात वाढले; दोन महिन्यात ७ ठार, १५ गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 07:33 PM2021-02-10T19:33:35+5:302021-02-10T19:36:07+5:30
Murtijapur Accident News अपघातात ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गत दोन महीन्यात २१ पघात झाले आहेत. त्यात १४ गंभीर अपघाताचा समावेश आहे. या १४ अपघातात ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे. ९ जणांना किरकोळ इजा झाली आहे.
तालुक्यातील विविध भागात दोन महिन्याच्या कालावधीत २१ अपघात झाले आहेत यात ७ किरकोळ अपघात असून १४ अपघात गंभीर झाले आहे. सर्वात जास्त अपघात दर्यापूर रोडवर मूर्तिजापूर - सिरसो, कारंजा रोडवर मूर्तिजापूर - हातगाव व राष्ट्रीय महामार्गावरील खरब खरबडी ते अनभोरा दरम्यान घडले असून यात दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. १ डिसेंबर रोजी आसरा रोडवर दुचाकी घसरुन अनिल जोगी, एंडली हे गंभीर जखमी झाले, १९ डिसेंबर रोजी पिंजर रोडवर कंझरा - रामखेडा दरम्यान दुचाकीची अमोरासमोर धडक झाल्याने सैय्यद अजीम सैय्यद निसार (२५) राहणार पातुर नंदापूर हा जागीच ठार झाला. तर राजू लोडम, रवी खंडारे हे दोघे गंभीर जखमी झाले, २१ डिसेंबर रोजी कंझरा जवळ दुचाकीच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत राहिल अब्दुल रशीद, रवी केशव जाधव व अल्तमस अब्दुल रसीद हे तीघे गंभीर जखमी झाले. २२ डिसेंबर रोजी मुंबई वरुन लग्न पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या स्वाती श्रीकृष्ण अनभोरे (४५) यांच्या दुचाकीस राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या घटनास्थळीच ठार झाल्या. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत विनित गजानन गडवे (२१) राहणार हिरपूर हा गंभीररीत्या जखमी झाला. ३१ डिसेंबर रोजी माना येथील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या अॉटोला अज्ञात वाहनाने धडक देवून अनिल कोकणे (४८) हे जागीच ठार झाले. तर निलेश ढवळे (३४) व राजू चक्रे (२८) हे गंभीर जखमी झाले, ४ जानेवारी रोजी दशरथ राम सुपले यांच्या दुचाकीस खरब ढोरे रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा जवळ दोन ट्रक अमोरासमोर भिडल्याने ट्रक चालक गोविंद विश्राम पाल राहणार नागपूर हे जागीच गतप्राण झाले. ६ जानेवारी रोजी मालवाहूने दिलेल्या धडकेत शुभम जगदीश वाकोडे (२१) राहणार जामठी हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर त्याच दिवशी सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धक्का दिल्याने रामकृष्ण बागराज पवार (५०) राहणार खैरी आसेगाव हे गंभीर जखमी झाले. ८ जानेवारी रोजी सैय्यद रौशन सैय्यद रमजान हा पादचारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. १६ जानेवारी रोजी सेवकराम डाबेराव हा पादचारी दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाला. २३ जानेवारी रोजी सायकलने मजूरांचे डबे घेऊन जाण्यासाठी निघालेल्या आवेस खा तमिज खा (२१) या युवकास राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने चिरडले व २९ जानेवारी रोजी दुर्गवाडा येथे जाणाऱ्या उषा महादेव वानखडे या महिलेची दुचाकी घसरुन झालेल्या अपघात ती गंभीर जखमी झाली.
तालुक्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची व रस्ते रुंदीकरण करण्याची मागणी निवेदनाव्दारे वेळोवेळी करण्यात आली असली तरी संबंधित प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.