अकोला : कोरोना काळात जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांमधील आॅनलाइन व आॅफलाइन शिक्षणाच्या कामाचा लेखाजोखा सोमवार, २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बैठक बोलावली आहे.
कोरोना काळात गतवर्षीपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बंद आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ऑनलाइन आणि आॅफलाइन शिक्षण यासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी १४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार २१ जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, त्यामध्ये कोरोना काळात गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांना आॅनलाइन आणि किती विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देण्यात आले, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.
आॅनलाइन शिक्षणाच्या
पूर्वतयारीचाही घेणार आढावा!
कोरोना काळात गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत देण्यात आलेले आॅनलाइन व आॅफलाइन शिक्षणाच्या कामासह कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांमार्फत विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीच्या नियोजनाचाही आढावा सोमवारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगीतले.