अकोला : महावितरणच्या सगळ्याच विभागातील सर्वच स्तरावरील कर्मचा-यांनी केलेल्या सांघिक मेहनतीमुळे प्रगती झाली असून, यापुढेही आणखी अद्ययावत ज्ञानासोबत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहक सेवेचे सर्वोच्च शिखर गाठण्याचा संकल्प करण्याचे आवाहन अनिल डोये यांनी केले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या विद्युत भवनातील सभागृहात ६ जून रोजी महावितरण कंपनीचा १४ वा वर्धापन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये उपस्थितांना संबोधित केले.महावितरणच्या निर्मितीनंतर ग्राहकांना आणखी योग्य दाबाचा नियमित व अखंडित वीजपुरवठा व मोठ्या प्रमाणात उत्तम दजार्ची सेवा-सुविधा मिळावी यासाठी यंत्रणेचे नूतनीकरण, आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून, मागणीएवढा वीजपुरवठा आज आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी अकोला परिमंडळाचे अधीक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) राहुल बोरीकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक सुमेध बोधी, कार्यकारी अभियंते राजीव रामटेके, लोखंडे, प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सूत्रसंचालन व्यवस्थापक शिवाजी तिकांडे यांनी तर आभार उपव्यवस्थापक अनंता साबळे यांनी केले. यावेळी अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र उपस्थित होते.