वेतन १ तारखेला न झाल्यास कारवाई; शालेय शिक्षण विभागाने दिला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:16 AM2019-08-04T11:16:18+5:302019-08-04T11:16:43+5:30
अकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, असे निर्देश आधीच दिल्यानंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये दिरंगाई केली जात आहे.
अकोला : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, असे निर्देश आधीच दिल्यानंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये दिरंगाई केली जात आहे. हा प्रकार न थांबल्यास १ तारखेला वेतन न झालेल्या शाळा, जिल्ह्यांची माहिती तातडीने सादर करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व संबंधितांना २ आॅगस्ट रोजी दिला आहे. सोबतच मुस्लीम बांधवांचे बकरी ईद सणाच्या निमित्ताने वेतन कोणत्याही परिस्थितीत ५ आॅगस्टपर्यंत करण्याचेही बजावले आहे.
राज्यातील शिक्षक, ग्रामसेवकांच्या वेतनाला कमालीचा विलंब होत असून, संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा फटका या दोन्ही संवर्गाला बसत आहे. त्यामुळे या संवर्गात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत शिक्षकांचा जून महिन्याचा पगार आजपर्यंतही झालेला नाही. शिक्षण विभाग, अर्थ विभागातील अधिकारी-कर्मचाºयांच्या बेपर्वाईचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना सहन करावा लागत आहे. जून-जुलै हा शाळा सुरू होण्याचा व लग्नसराईचा काळ होता. त्यातच मुलांच्या शाळांची फी, कुटुंबातील लग्नकार्य, खर्च प्रचंड असताना वेतनच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक पार हवालदिल झाले. शिक्षकांनी घेतलेले गृहकर्ज, वैयक्तिक, शैक्षणिक, वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या काळजीनेही शिक्षकांची झोप उडाली. वेतनाच्या अनियमिततेमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य नाही. त्यामुळे जादा व्याजाचा भुर्दंडही भरावा लागत आहे. ही समस्या निकाली न निघाल्यास शिक्षकांना आर्थिक संकटातून मार्ग काढणे कठीण होणार आहे. या प्रकाराच्या तक्रारी राज्य शासनाकडेही झाल्या आहेत. एकीकडे गतिमान प्रशासन सुरू असताना कर्मचाºयांना वेतन मिळण्यास विलंब का होत आहे, यावरही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच द्यावे, तसे न झाल्यास याप्रकरणी जबाबदार सर्वच अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करावी, असे पत्र २ आॅगस्ट रोजी कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी दिले आहे.