जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित! १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनिसांचा समावेश
By संतोष येलकर | Published: February 16, 2024 08:46 PM2024-02-16T20:46:33+5:302024-02-16T20:47:46+5:30
जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत गुरुवारी जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनिसांना उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनीस आणि एका पर्यवेक्षिकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अंजली आंबेडकर उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षण व आरोग्य सभापती माया नाइक, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य पुष्पा इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला सदस्य, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनीस आणि एक पर्यवेक्षिकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सन्मानचिन्ह, पैठणी देऊन केला सन्मान !
या कार्यक्रमात जिल्ह्यातील १४ अंगणवाडीसेविका, एक पर्यवेक्षिका आणि १४ मदतनीस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पैठणी देऊन कार्यगौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले.