- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे युवराज म्हणून विरोधकांनी टिकेचे लक्ष्य केलेल्या राहूल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी काँग्रेसने राज्यभरात त्यांचा युवकांशी संवाद घडवून आणला होता. या युवा संवादातून राहूल गांधी देशाला व त्यांना देश कळला. नेमका असाच पॅर्टन शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकीय बांधणी करण्यासाठी निवडला आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने ते सध्या राज्यभर युवकांशी संवाद साधत आहेत. परवा पश्चीम वºहाडात त्यांची जनाआर्शिवाद यात्रा येऊन गेली. ही यात्रा म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला आकार देण्याचा प्रयत्न मानले जाते. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सुरू असलेल्या यात्रेतुन राजकीय संचित वाढविण्याचाच शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने अधोरेखीत झाले.यात्रेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, गावात पाणी पोहचले नाही, शिक्षण शुल्क वाढले, कोचींग क्लासचे पीक आले इतकच काय तर महाराष्टÑाची लालपरी संकटात आहे अशा अनेक प्रश्नांवर तरूणाईने आदित्य ठाकरेंना विचारणा केली. त्यांनी सर्वच प्रकाराच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला, कोणताही प्रश्न टाळला नाही, ही बाब चांगली आहे मात्र या यात्रेमधून समोर आलेल्या समस्यांची दखल कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.शिवसेना सत्तेत असतानाही सकाराच्या विरोधात भूमिका घेते, जे प्रश्न आदित्य यांच्या समोर आले त्याप्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत होते मग सरकारचे हिस्सेदार म्हणून जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची सोडवणूक आता उरलेल्या पंधरा दिवसात शक्य नाही त्यामुळे पुढेही सत्ता द्या हे प्रश्न ठेवणार नाही असाच जोगावा मागण्याचा प्रयत्न म्हणजे ही यात्रा. आचारसंहिता लागण्यापूर्वी या यात्रेत समोर आलेल्या काही प्रश्नांची तड लागली तर आदित्य यांनी साधलेल्या संवादाला फळ आले असे म्हणता येईल अन्यथा संवादातून सत्तेचा सोपान चढण्यासाठी निघालेल्या यात्रेतील आणखी एक यात्रा एवढीच या यात्रेची नोंद !नेत्यांमध्येच विसंवादआदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यांचे स्वरूप हे संवाद यात्रा असले तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मात्र विसंवाद असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्टपणे समोर आले. निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेला हा विसंवाद सेनेला चांगलाच त्रास दायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.अपेक्षांचे ओझेकर्तृत्ववान वडिलधाऱ्यांच्या पाऊलखुणांवर चालतांना त्यांच्या वारसांवर अपेक्षांचे मोठे ओझे असते. या वारसांचे मुल्यमापन करताना सहाजीकच सामान्यांची फुटपटटी पुर्वसुरूींच्या कर्तृत्वाशी तुलना करते. आदित्य ठाकरे यांच्या वाटेलाही असे अपेक्षांचे ओझे आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातु व उद्धव ठाकरे यांचा पुत्र अशी ओळख घेऊन बाहेर पडलेल्या आदित्य यांना स्व:ताची ओळख निर्माण करण्याची संधी या यात्रेने दिली.त्यामुळे वक्तृत्वाचा तो वारसा त्यांच्या जवळ नसला तरी अनुभव मिळवून परिश्रमाने कर्तृत्वाचा आलेख ते उंचावू शकतात त्यासाठी या यात्रेत दिलेली वचने प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.