ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:16 PM2021-01-13T18:16:23+5:302021-01-13T18:16:33+5:30
Gram Panchayat elections News कायदा व सुव्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक निर्भयपणे व शांततेने होण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, सर्व तयारीनिशी प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
शुक्रवार, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भातील तयारी, कायदा व सुव्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत संजय खडसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्नेहा सराफ, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार विजय लोखंडे, अधीक्षक मीरा पागोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आवश्यक बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांबाबत घ्यावयाची दक्षता, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा कक्षांचे बंदोबस्त, मतमोजणी बंदोबस्त तसेच मतमोजणीनंतर अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी घ्यावी लागणारी दक्षता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.