आता रेल्वेमध्ये पार्सलचेही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:25 AM2020-09-14T10:25:25+5:302020-09-14T10:25:43+5:30

१२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता अपेक्षित पार्सल भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलकरिता जागा आरक्षित करता येणार आहे.

Advance booking of parcels in railways now | आता रेल्वेमध्ये पार्सलचेही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

आता रेल्वेमध्ये पार्सलचेही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

Next

अकोला : भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधेत भर घालतानाच मालवाहतूक आणि पार्सल वाहतूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. मालवाहतुकीस प्रोत्साहन देण्याकरिता या पूर्वीच विविध सवलती देण्यात येत आहेत. पार्सल वाहतुकीस चालना देण्यासाठी नियमित रेल्वे गाड्यांमध्ये तसेच टाइम टेबल पार्सल विशेष रेल्वे गाड्यांमध्ये यापुढे पार्सल वाहतुकीकरिता एसएलआर आणि पार्सल व्हॅन (व्हीपी) मध्ये जागा अ‍ॅडव्हान्स बुक करता येणार आहे. या सुविधेअंतर्गत १२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता अपेक्षित पार्सल भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलकरिता जागा आरक्षित करता येणार आहे. उरलेले ९० टक्के पार्सल भाडे गाडीच्या सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. ग्राहक ठरल्याप्रमाणे गाडीच्या ७२ तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या वेळेस भरलेले १० टक्के पार्सल भाडे जप्त केले जाईल आणि पार्सलची अ‍ॅडव्हान्स बुकिंग रद्द करण्यात येईल. या नवीन नियमानुसार नियमित प्रवासी गाड्यांमध्ये आणि टाइम टेबल पार्सल गाड्यांमध्ये पार्सल व्हॅनसुद्धा १२० दिवस अगोदर म्हणजेच अ‍ॅडव्हान्स बुक करता येणार आहे. याकरिता पूर्वीप्रमाणेच वॅगन डिमांड रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे.

७२ तासांपूर्वी रद्द करता येईल बुकिंग
पार्सलसाठी बुक केलेली जागा रद्द करावयाची असेल तर गाडी सुटण्याच्या ७२ तास पूर्वी रद्द करता येईल. अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम परत मिळेल; परंतु ७२ तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केली तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल.

व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि रेल्वेने पार्सल वाहतूक करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानाकरिता जागा सुरक्षित करावी आणि आपला व्यवसाय वाढवावा.
- उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड.

Web Title: Advance booking of parcels in railways now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.