पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी हवे २८.१० कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:12 AM2020-10-03T10:12:02+5:302020-10-03T10:12:10+5:30
Agriculture News २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांचा मदत निधी अपेक्षित आहे.
अकोला : अतिवृष्टी व पुरामुळे जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १ हजार १६ गावांतील ४९ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांच्या मदत निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांसह शासनाच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आला.
यावर्षीच्या पावसाळ्यात जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुराने जिल्ह्यात खरीप पिकांसह बागायत पिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी शेतजमीन खरबडून गेली. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १६ गावांमध्ये ४९ हजार ८३५ शेतकºयांचे ३८ हजार ६४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांसह शासनाच्या कृषी विभागाकडे सादर करण्यात आला असून, पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाची मदत देण्यासाठी २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांचा मदत निधी अपेक्षित असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!
जिल्ह्यातील पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ४७ हजार ५३५ शेतकºयांचे ३८ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे, २१ शेतकºयांचे ९ हेक्टर क्षेत्रावरील बागायत पिकांचे, ५ शेतकºयांचे १ हेक्टर ०७ आर क्षेत्रावरील फळपिकांचे आणि जमीन खरबडून गेल्याने २ हजार २७४ शेतकºयांचे २६६ हेक्टर ६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान!
पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान मूग पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार ५६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ३ हजार ४४ हेक्टर सोयाबीन, २ हजार ८१३ हेक्टर कपाशी ११३ हेक्टर ज्वारी, ६४० हेक्टर तूर व १ हजार १८८ हेक्टर उडीद पिकाचे नुकसान झाले आहे.