मिनी बायपास ठरताेय जीवघेणा!
अकाेला : खदान पाेलीस ठाणे ते निमवाडी परिसराकडे येणाऱ्या मिनी बायपासच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे़ यादरम्यान याच मार्गावर उड्डाणपुलाचे निर्माणकार्य हाेत आहे़ उड्डाणपुलाचे काम करीत असताना निमवाडी परिसराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने पुलाच्या दाेन्ही बाजूंचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे़
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
अकाेला : खदान पाेलीस स्टेशनच्या जागेवर वास्तू उभारली जात आहे़ यामुळे खदान ते सिंधी कॅम्प रस्त्याच्या दाेन्ही कडेला बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक उभे राहतात. यामुळे वाहतूक विस्कळीत हाेण्यासाेबतच रस्त्यावर माती साचली असल्यामुळे वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे़
चाचणी करा, अन्यथा दुकानाला सील
अकोला : शहरातील व्यावसायिकांना दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी अनिवार्य केली आहे. दुकान संचालक व दुकानांमधील सर्व कामगारांची काेराेना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल साेबत ठेवणे बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह नसल्यास किंवा चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानाला सील लावण्याचा इशारा मनपाने दिला.
नियमांकडे नागरिकांची पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्यालयांत कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.
क्षयराेग विभाग रामभराेसे
अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारीत मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. या ठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.
सिव्हिल लाइन रस्ता ठरताेय जीवघेणा
अकाेला : शहरातील वर्दळीच्या असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला असून उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
उड्डाणपुलामुळे रस्त्यावर खड्डे
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे.