राजेश शेगाेकार :
अकाेला : प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक, राज्यमंत्री बच्चू कडू व अकाेट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे या दाेन्ही नेत्यांचा अकाेट मतदारसंघावर वरचष्मा कायम ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. आ. भारसाकळे यांनी सलग दुसरा विजय मिळवून ‘पार्सल’ हा अपप्रचार खाेडून काढला आहे, तर बच्चू कडू पालकमंत्री झाल्यापासून मिळेल ताे निधी अकाेट मतदारसंघात वळता करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या दाेन्ही नेत्यांमधील सत्तासंघर्ष लपून राहिलेला नाही या पृर्श्वभूमीवर हे दाेन्ही नेते मात्र त्यांच्या स्वजिल्ह्यात एकमेकांच्या गळ्यात गळे घालून निवडणुकीला समाेरे जात आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत हे दाेन्ही नेते एकाच पॅनलमधून रिंगणात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रणीत पॅनलच्या विराेधात ही निवडणूक रंगत असल्याचे अकाेल्याच्या राजकीय वर्तुळाचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतुन ५५ उमेदवारांनी माघार घेतली आहे, तर ५० उमेदवार रिंगणात आहेत. चार सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून चार संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १७ जागांकरिता ४ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत ना. बच्चू कडू, आमदार प्रकाश भारसाकळे यांचे परिवर्तन पॅनल रिंगणात आहे तर यांच्या विराेधात काँग्रेसच्या नेत्या व मंत्री यशाेमती ठाकूर आ. बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलमध्ये थेट लढत हाेत आहे.
विराेधाचा दिखावा, अकाेटसाठी आटापिटा
अकाेट मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वांना बाजूला ठेवत येथील जनतेने प्रकाश भारसाकळे यांना दाेन वेळा विधानसभेत पाठिवले. मात्र, अकाेटातील विकासाचे चित्र अजूनही अंधारलेलेच आहे. विकासाच्या धमन्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था येथील विकासाचे बाेलके चित्र आहे. दुसरीकडे पालकमंत्री बच्चू कडू यांचे अकाेटवरील प्रेम लपून राहिलेले नाही. जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे असले तरी मदतीचे पारडे अकाेटकडेच झुकते. इतकेच नाही तर प्रहारचे प्रदेशाध्यक्ष ठरवितानाही त्यांनी लाेकजागरमधून पक्षासाठी नेतृत्व आयात करून घेतले. भारसाकाळे व कडू हे दाेन्ही नेते अमरावतीकर आहेत. अकाेटात एकमेकांना विराेध करणारे अमरावतीत मात्र एकत्र असल्याने विराेधातील राजकीय साेय या निमित्ताने समाेर आली आहे.
भावाच्या विराेधातच भारसाकळेंचे दंड
दर्यापूर तालुका सेवा सहकारी साेयायटी मतदारसंघातून आमदार प्रकाश भारसाकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विराेधात बँकेचे विद्यमान संचालक सुधाकर भारसाकळे हे उभे ठाकले असून ते त्यांचे बंधू आहेत. अवघ्या ७५ मतांसाठी या दाेन बंधूंमध्ये घमासान रंगली असल्याने ही सर्वांत लक्षवेधी लढत ठरत आहे.
राज्यमंत्री विरुद्ध जि.प. अध्यक्ष
चांदूरबाजार सेवा सहकारी मतदारसंघातील राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हा परिषद, जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख पुन्हा आमने-सामने आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही या दाेघांमध्ये लढत झाली हाेती. आता ४१ मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात दोन्ही दिग्गजांना २१ मतांसाठी झगडावे लागत आहे.