लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढून त्याची तस्करी करणारी टोळी स्थानिक एमआयडीसी परिसरात सक्रिय असून, याकडे ‘एमआयडीसी’ प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मागील एका महिन्यात अशा प्रकारच्या दहा चोरीच्या घटना समोर आल्या असून, एमआयडीसी परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी पुन्हा अशीच घटना एमआयडीसी फे स क्रमांक-३ च्या सुदर्शन इंडस्ट्रीजवळ आणि फेस क्रमांक दोनमध्ये घडली आहे.ट्रान्सफॉर्मरमधील तेलाची चोरी काही सेकंदात होत नाही. त्यासाठी मोठी यंत्रणा आणि कि मान ३0 ते ३५ मिनिटे लागतात. ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढल्यानंतर ते कॅन किंवा ड्रममध्ये भरून वाहून नेण्यासाठी टँकर किंवा ऑटोरिक्षाचा वापर होत असेल. त्यामुळे या तेल तस्करीत टोळी असण्याची दाट शक्यता आहे. दररोज मोठय़ा प्रमाणात तेलाची तस्करी होत असताना कुणाचे लक्ष त्याकडे जात नसेल काय, असा प्रश्न एमआयडीसीतील उद्योजक आणि नागरिकांमधून उपस्थित होत आहे. ट्रान्सफॉर्मरमधून होणारी तेल चोरी पोलिसांच्या नजरेतून कशी सुटते, असा प्रश्नही केला जातो आहे. ज्या भागात तेलाची चोरी होत आहे, त्या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविली पाहिजे. सोबतच ट्रान्सफॉर्मर असलेल्या ठिकाणी परिसरातील उद्योजकांनी चौकीदारास लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. एमआयडीसीतील तेल चोरी करण्याचे प्रकार वाढले असल्याने उद्योजक त्रासले आहेत. महावितरण कंपनी, पोलीस यांनी तेलाची तस्करी करणार्या टोळी गजाआड करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याची तयारी उद्योजकांमध्ये सुरू आहे.
वीज पुरवठा होतो खंडितट्रान्सफॉर्मरमधील तेल काढल्या गेल्यानंतर काही वेळात परिसराला होणारा वीज पुरवठा खंडित होतो. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तेल काढून विकणारी टोळी सक्रिय असल्याशिवाय हे शक्य नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाल आहेत; मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत.