लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकरी, शेतकर्यांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच स्वत:चे कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. एक महिना हे प्रशिक्षण अकोला येथे दिले जाणार आहे. याकरिता केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेने आर्थिक सहाय्य केले आहे.बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतीय शेती व्यवसायाला गती देण्यासाठी शेतीपूरक जोडधंद्यांचे जाळे गुंफल्याशिवाय वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्याचे स्वप्न कृतीत येणार नाही. त्यासाठी उपलब्ध संसाधनांवर आधारित कृषिपूरक जोडधंद्यांची निवड व कौशल्यप्राप्ती निर्णायक ठरणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक उपक्रम राबविले असून, विविध संस्थांच्या सहयोगाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन वर्षभर करण्यात येते. कौशल्यप्राप्ती नंतर आपले स्वत:चे उद्योग उभारून स्वयंपूर्ण झालेले व इतरांना रोजगार देण्यास सक्षम झालेले अनेक तरुण यशस्वी उद्योजक झाले आहेत. या अनुषंगाने या कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाच्यावतीने अकोला येथे दिल्ली येथील भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या सहयोगाने एक महिना कालावधीच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन २ ते ३0 जानेवारी २0१८ दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये माळी प्रशिक्षण हा स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा विषय असून, विदर्भातील रहिवासी असलेले जे तरुण मुले-मुली स्वयंरोजगार करू इच्छितात, अशा तरुणांकरिता सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. प्रवेशासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वर्ग ५ वा उत्तीर्ण असावा. तसेच २0 डिसेंबर २0१७ रोजी उमेदवारांचे वय १६ ते ३0 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षणामध्ये हिरवळ तयार करणे, हिरवळीचे व्यवस्थापन करणे, विविध फुले व शोभीवंत झाडांचे अभवृद्धी करणे, रोप वाटिकेचे व्यवस्थापन करणे व रोप वाटिकेतील विविध रोपे व कलमांची निर्मिती करणे व त्यांची निगा राखणे, तसेच फुलांची मूल्यवृद्धी आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या सहयोगाने आयोजित या प्रशिक्षणासाठी इच्छुक विदर्भातील तरुणांनी २0 डिसेंबरपयर्ंत उद्यानविद्या विभाग अकोला येथे संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.- डॉ. डी.एम. पंचभाई, विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.