पाण्याअभावी अकोल्यातील उद्योगांना घरघर; कुंभारी तलावात फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:04 AM2018-01-22T01:04:05+5:302018-01-22T02:29:37+5:30
अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात आहे. भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा कुंभारी तलावात आहे. भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे.
नागपूरनंतर विदर्भात अकोला एमआयडीसीचे उद्योग राज्य शासनाला मोठा महसूल देतात. अकोल्यातील डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगर आदी व्यवसायाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या उद्योगांना पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने दर दोन वर्षांनंतर येथे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. यंदाही पाणी समस्येमुळे हे उद्योग अडचणीत सापडले असून, उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन हतबल झाले आहे. अलिकडेच ‘फूड एक्स्पो’ कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री येथे आले तेव्हा उद्योजकांसोबत त्यांची बैठक झाली होती.त्या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी या समस्येत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने पुढील आठवड्यात आ. गोपीकिसन बाजोरीया तसेच संबंधीत अधिकार्यांची उद्योगमंत्र्यांसोबत बैठक होत असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
एमआयडीसीची पाणी समस्या गंभीर होत असून, एमआयडीसी प्रशासनाने अजूनही याची दखल गंभीरतेने घेतलेली नाही. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या बाबींकडे एमआयडीसी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अजूनही तातडीची उपाययोजना हवी आहे.
- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.
एमआयडीसीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात तातडीच्या उपाययोजनांवर निर्णय होईल. कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी ६४ खेडी खांबोरा प्रकल्पाच्या पाइपलाइनचा व्यास वाढवून त्यातून एमआयडीसीला पाणी पुरवठा शक्य आहे. यामध्ये शासनाचे केवळ ६-७ कोटी जातील. या तुलनेत महान, घुंगशीतून पाणी मिळविणे ४0 कोटींच्या घरात जाईल.
- आमदार गोपीकिसन बाजोरिया, अकोला.