अकोला : महिला जळाल्याचे प्रकरण; पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:02 PM2017-12-19T23:02:29+5:302017-12-19T23:02:59+5:30
अकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली; मात्र हा खून नसून, सदर महिलेने आत्महत्या केल्याचा संशय पोलीस अधीक्षकांनीही व्यक्त केला.
दगडी पुलानजीक एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. जळालेल्या महिलेचे वय ६५ वर्षांच्यावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिला उभी असताना जळाली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सदर गंभीर प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळाची पुन्हा तपासणी केली. यामध्ये महिलेने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
खून नसल्याचे जवळपास निश्चित
उत्तरीय तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला असून, यामध्ये महिलेचा खून झाला नसल्याचे जवळपास निश्चित आहे. या महिलेने आत्महत्या केल्याचाच संशय पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकार्यांना आहे; मात्र तरीही पोलिसांनी चारही दिशेने तपास सुरू ठेवला आहे.
घटनास्थळावर मिळालेले साहित्य
घटनास्थळावर पिवळय़ा धातूची बांगडी, अंगठी, तीन चावीचे गुच्छे, एक चष्मा, पाणी बॉटलचे झाकण, पांढरे पट्टे असलेले निळसर साडीचे तुकडे कथ्थ्या रंगाचे ब्लँकेट घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे.