अकोला : शैक्षणिक, तंत्रज्ञानाचा करणार विकास; डॉ.पंदेकृविचा इथिओपियासोबत सामंजस्य करार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:05 AM2018-02-25T01:05:34+5:302018-02-25T01:05:34+5:30
अकोला : शेती, कृषी शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन शैक्षणिक, तंत्रज्ञान विकासासाठी इथिओपियाच्या वोल्काईट विद्यापीठासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शनिवारी सामंजस्य करार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेती, कृषी शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन शैक्षणिक, तंत्रज्ञान विकासासाठी इथिओपियाच्या वोल्काईट विद्यापीठासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शनिवारी सामंजस्य करार केला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागतिक कीर्तीचे कृषी क्षेत्रात संशोधन तसेच तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. परंतु, तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, विश्वात होणार्या या संशोधन,तंत्रज्ञानाची माहिती विदर्भासह संपूर्ण देशाला होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने मागील चार महिन्यांत विविध देशातील नामवंत विद्यापीठांसह देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. इथिओपिया व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शिक्षण व संशोधनाचा दृष्टिकोन सारखा असून, या कराराच्या माध्यमातून दोन्ही विद्यापीठाचे कृषी शिक्षण व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होईल. तदव्तच येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील त्या विद्यापीठातील कृषी शिक्षणविषयक सोयी, सुविधा व संसाधनाचा उपयोग करू न घेता येईल.
इथिओपियाच्या वोल्काईट विश्वविद्यालयांतर्गत सात महाविद्यालये असून, १,५00 क्षमता असलेली ४६ स्नातकोत्तर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला वोल्काईट विश्वविद्यालयाचे सुशील सक्करवार, डॉ. पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. पी.आर.कडू, कापणीपश्चात संशोधन तंत्रज्ञान विभागाचे संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, नियंत्रक विद्या पवार यांची उपस्थिती होती.