अकोला: जिल्हा सत्र न्यायालयाची नवी इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली असून, रविवार १४ जुलै रोजी इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.नऊ वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली अन् काही दिवसातच इमारत बांधकामास सुरुवात झाली; मात्र मध्यंतरी इमारतीचे बांधकाम स्थगित होते. यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये जिल्हा व प्रमुख न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे रुजू झाल्यानंतर पुन्हा या कामाला गती आली. अखेर जून २०१९ मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली. या इमारतीचे लोकार्पण रविवार १४ जुलै रोजी होणार आहे. या सोहळ््याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह, विधी व न्याय मंत्री डॉ. रणजित पाटील, नागपूर खंडपीठाचे अकोला जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती पी.एन. देशमुख, न्यायमूर्ती एस.बी. शुक्रे, न्यायमूर्ती झेड. ए. हक, न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे, न्यायमूर्ती आर.बी. देव, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे व अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष एम.एल. शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या इमारतीमध्ये १६ न्यायालये राहणार असून, यामध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था, फायर स्प्रिंकलर, तसेच बार रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.