लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी अमरावती येथे आयोजित विभागीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.जिल्हा विकास आराखडा आणि अतिरिक्त निधी मागणीच्या विषयावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे विभागीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांच्यासह विविध विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण ) योजनेंतर्गत सन २0१८-१९ या वर्षात विविध विकास कामांसाठी विविध यंत्रणांकडून ३५२ कोटी ७२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या निकषानुसार ११५ कोटी ६५ लाखांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीमार्फत गत महिन्यात मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीची मागणी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय बैठकीत करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विकास कामांसाठी यंत्रणांच्या मागणीनुसार २३७ कोटी ७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
मोर्णासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवा!मोर्णा नदी विकासाचा ‘डीपीआर’ करण्यात येत असून, निधीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी खा. संजय धोत्रे, गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल आणि जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतींची कामे, शेतकर्यांचा गटशेती लक्ष्यांक वाढविणे, खारपाणपट्टय़ात ‘आरओ प्लान्ट’ उभारणे, सांस्कृतिक सभागृह, ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती