अकोला जिल्ह्यात यंदाही बुडाले मूग, उडदाचे पीक; शेतकरी चिंतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 11:06 AM2021-07-11T11:06:36+5:302021-07-11T11:06:44+5:30
Agriculture News : यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
- संतोष येलकर
अकोला: पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५ टक्के आणि उडीद पिकाची ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पेरणीनंतर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यातील मूग पेरणीचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६३७ हेक्टर आणि उडीद पेरणीचे सरासरी क्षेत्र १६ हजार ६५२ हेक्टर आहे. ६५ दिवसांत काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करता येते, परंतु यंदाच्या पावसाळ्यात १५ जूननंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाची पेरणी रखडली. त्यामुळे ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५.४ टक्के आणि उडीद पिकाची केवळ ४३.८ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात हाताशी आलेले मूग व उडदाचे पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्हयातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची पेरणी होऊ शकली नाही आणि उगवलेल्या पिकांचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग व उडदाचे पीक बुडाल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
मूग व उडीद पेरणीचे असे आहे वास्तव! (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी
मूग २२६३७ १०२६९ ४५.४
उडीद १६६५२ ७२९५ ४३.८
कपाशीच्या पेऱ्यातही होणार घट; सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढणार!
पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यातही घट होणार आहे. जिल्ह्यात कपाशी पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टर इतके असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ६२ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत कपाशी पिकाची पेरणी करता येणार असून, गत दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कपाशीची पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु पेरणीचा कालावधी उलटून जात असल्याने, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीची पेरणी कमी होणार असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.
पावसात खंड पडल्याने मूग व उडीद या पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे, तसेच सरासरीच्या तुलनेत कपाशी पेरणीच्या क्षेत्रातही घट होऊ शकते. पाऊस सुरू झाल्याने रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.
- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.