संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उत्पादक शेतकर्यांना लागली आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील मूग, उडिदाचे पीक बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला. विदर्भातील पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अकोला जिल्हय़ात कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अकोल्यासह अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक फस्त झाले. हाताशी आलेल्या कापूस पिकाचे उत्पादन बुडाल्याने, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येत असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकर्यांकडून केली जात आहे.
अकोला जिल्हय़ात एक लाख हेक्टरवरील ‘कपाशी’चे नुकसान?गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत गठित पथकांकडून करण्यात येणार आहे. तथापि, अकोला जिल्हय़ात पेरणी केलेल्या सर्वच १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.