लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे आणि तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्यांना दिला होता; परंतु १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील सातपैकी अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व पातूर या चारच तालुक्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. उर्वरित अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील संयुक्त स्वाक्षरीचे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल अद्यापही सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा एकीकृत अहवाल सोमवारपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांमार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर होऊ शकला नाही. त्यानुषंगाने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल अद्याप प्रशासनाच्या गुलदस्त्यातच अडकला आहे.
अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्याची प्रतीक्षा जिल्हय़ातील चार तालुक्यातील कपाशी नुकसानाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले; मात्र अकोट, तेल्हारा व बाळापूर या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल अद्याप रखडले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील कपाशी नुकसानाचे रखडलेले अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोनच तहसीलदारांनी दिले ‘शो-कॉज’चे उत्तर!कपाशी पीक नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकार्यांना गत २७ डिसेंबर रोजी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावून, ३0 डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला होता. १ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोनच तहसीलदारांचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, इतर संबंधित अधिकार्यांचे स्पष्टीकरण अद्यापही प्राप्त झाले नाही.
शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा?जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल अद्याप जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचा अहवाल शासनाकडे केव्हा सादर करण्यात येणार आणि जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.-