अकोला : अमर पंजाबी आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:25 AM2017-12-29T01:25:12+5:302017-12-29T01:26:06+5:30
अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्या वरास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्या वरास अटक केली.
२६ नोव्हेंबर रोजी एका १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार, खदान पोलिसांनी अमर पंजाबी व आशिष अडवाणी यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३५४ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यामुळे व्यथित झालेल्या अमर पंजाबी याने बुधवारी गायगावजवळील रेल्वेमार्गावर रेल्वेगाडीखाली स्वत:ला झोकून आत्महत्या केली. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिचे आईवडील व तिच्या होणार्या वराविरुद्ध भादंवि कलम ३0६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला.
गुरूवारी आरोपींना अटक करण्यात आली. गुरूवारी शोकाकुल वातावरणात अमर पंजाबी याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरने लिहून ठेवली चिठ्ठी
अमर पंजाबी याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्या करण्यासाठी मुलीने विनयभंगाचा आळ त्याच्यावर घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याच्या आत्महत्येसाठी मुलगी व तिचे कुटुंबीय जबाबदार असल्याचे चिठ्ठील लिहून ठेवले. या चिठ्ठीच्या आधारावर डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.