थॅलेसीमिया रुग्णांसाठी ‘जीएमसी’त औषधेच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:28 PM2019-05-13T12:28:43+5:302019-05-13T12:30:05+5:30
अकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत.
- प्रवीण खेते
अकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केंद्राच्या योजनेंतर्गत इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला; मात्र तो पर्याप्त नसल्याने रुग्णांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
थॅलेसीमिया, सिकलसेल आणि हिमोकिलिया या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनांतर्गत प्रत्येक विभागात एक ‘डे केअर सेंटर’ उपलब्ध करून दिले. या सेंटरच्या माध्यमातून संबंधित विभागातील रुग्णांना आवश्यक औषध पुरवठा केला जातो; परंतु विभागातील आरोग्य यंत्रणेपर्यंत या औषधी योग्य वेळत पोहोचतच नसल्याने थॅलेसीमियाच्या रुग्णांना योग्य वेळी औषध मिळत नाही. आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांना योग्य वेळी औषध न मिळाल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते; परंतु त्यांना नियमित उपचार देण्यात जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे.
गोळ्या आहेत, तर इंजेक्शन नाही
राज्यातील काही शासकीय रुग्णालय वगळल्यास बहुतांश ठिकाणी थॅलेसीमियाचे औषधेच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. विभागाचे ठिकाण सोडल्यास इतर जिल्ह्यात थॅलेसीमिया रुग्णांसाठी इंजेक्शनदेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी विभागीय ‘डे केअर सेंटर’ला भेट द्यावी लागते.
जिल्हा स्तरावर हवे ‘डे केअर सेंटर’
केंद्र शासनाच्या अखत्यारीत प्रत्येक विभागात विभागीय स्थळी सुरू असलेल्या डे केअर सेंटरपर्यंत प्रत्येक रुग्ण पोहोचू शकत नाही. शिवाय, जिल्हा स्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांमध्येही थॅलेसीमियाचे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत या रुग्णांसाठी जिल्हा स्तरावर डे केअर युनिट असणे गरजेचे आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन नव्हते. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत अमरावती येथील डे केअर सेंटरमधून इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.