Akola GMC : नॉन कोविड ओपीडी दहा टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:46 PM2020-07-08T12:46:21+5:302020-07-08T12:46:35+5:30
गत तीन महिन्यात सरासरी रुग्णांच्या केवळ १० टक्केच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वोपचार रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडीवरील रुग्णांचा भार कमी झाला आहे. गत तीन महिन्यात सरासरी रुग्णांच्या केवळ १० टक्केच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.
गत तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका नॉन कोविड ओपीडीला बसला आहे. शासकीयच नाही, तर खासगी रुग्णालयातही नॉन कोविड ओपीडीतील गर्दी कमी झाली आहे. सर्वोपार रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडी गत तीन महिन्यात दहा टक्क्यांवर आली आहे. बहुतांश रुग्ण फॅमिली डॉक्टर किंवा संपर्कातील डॉक्टरांकडून फोनवरूनच मौखिक चाचणी घेत आहेत. किरकोळ रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील सर्वसाधारण पाच वॉर्डांपैकी केवळ एकाच वार्डात रुग्ण दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
औषधांचा साठा पुरेपूर
ऐरवी सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असायचा; परंतु बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने औषधांची जास्त गरज भासत नाही. शिवाय, हापकिनकडूनही मागणी केलेली औषधी काही दिवसांपूर्वीच जीएमसीला प्राप्त झाल्यात. त्यामुळे सध्या रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या घटली!
सर्वोपचार रुग्णालयात बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातून यायचे; परंतु लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येणे कठीण झाले होते. त्यामुळे स्थानिक स्तरावरच किंवा घरगुती उपचार घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांनी शहरात येण्यास टाळले. परिणामी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांची मोठी गर्दी कमी झाली.