अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे
By atul.jaiswal | Published: January 25, 2018 01:48 PM2018-01-25T13:48:09+5:302018-01-25T13:54:43+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी त्यांचा हा इशारा मागे घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बुधवारी दिली.
जन औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे आपल्याला व आपल्या पतीला मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडेही त्यांनी याबाबत तक्रार केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप उमप, न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल बत्रा आणि स्त्री व प्रसूती रोग विभाग प्रमुख डॉ. अपर्णा वाहने यांचा समावेश असलेली समिती गठित केली. सदर समितीची बैठक बुधवारी अधिष्ठाता यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत डॉ. कल्पना काळे (अस्वार)व त्यांचे पती डॉ. अस्वार उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समितीला एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला. यानंतर डॉ. कल्पना काळे यांनी आपला आत्मदहनाचा इशारा मागे घेत असल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. संस्थेची प्रतिमा कायम राखण्यासाठी व अधिष्ठाता यांच्या आश्वासनाला अनुसरून हा इशारा मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. हुमने यांचा प्रभार काढला!
डॉ. कल्पना काळे यांनी डॉ. हुमने यांच्यावर आरोप केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी त्यांच्याकडून जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचा प्रभार या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हुमने हे सध्या प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या विभागाचा प्रभार अधिष्ठात डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे राहणार आहे.
चौकशी समितीला एका महिन्यात तपास पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. यानंतर डॉ. कल्पना काळे यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नरत असून, लवकरच यावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला