अकोला : गारपिटीने पळविला तोंडाशी आलेला घास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:05 AM2018-02-13T02:05:54+5:302018-02-13T02:07:14+5:30
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.
रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसासह अवकाळी गारपीट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत गहू, हरभरा या रब्बी पिकांसह संत्रा, केळी, टरबूज या फळ पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीने कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या शेतातील गहू, हरभर्याचे पीक उद्ध्वस्त झाले.
हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांसह सातही तहसीलदारांना दिला. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सोमवारपासून जिल्ह्यात गारपीटग्रस्त गावांतील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करा!
अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिला. त्यामध्ये पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, बाधित शेतकर्यांची संख्या, पीक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकर्यांची संख्या इत्यादी माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पीक नुकसानाची मदत द्या; गारपीटग्रस्तांची मागणी
अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने पळविला. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांकडून केली जात आहे.
घरांचे नुकसान!
अवकाळी पाऊस व गारपिटीचा घरांनाही तडाखा बसला आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे १५0 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा अहवाल अकोट तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
या गावांना तडाखा
तेल्हारा
दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा, शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, माळेगाव बाजार, हिरवखेड
अकोला
पळसो बढे, निपाणा, कौलखेड जहाँ., भोड, सुकोडा, खडकी, टाकळी, सिसा, मासा बोंदरखेड, डोंगरगाव
पातूर
खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी, सायवणी, दिग्रस बु., सस्ती
बाश्रीटाकळी
सायखेड, चेलका, धाबा, कान्हेरी सरप, सोनगिरी, सिंदखेड
बाळापूर
अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा फाटा, बोरगाव वैराळे
अकोट
आसेगाव, सावरा, मंचनपूर, कुटासा, देवरी, मुंडगाव
मूर्तिजापूर
लाईत, दातावी, भटोरी, पारद